औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे जाहीर केले.
दरम्यान मदान यांनी सांगितले की, राज्यात कोरोना विषाणूचा (कोव्हिड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा 10 ऑगस्ट 2005 रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आज (ता.17) रोजी आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.
औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश काढण्यात येतील, असेही मदान यांनी स्पष्ट केले आहे. व तसेच निवडणूक आयोगाचे पत्र जारी केले आहेत.